- विजय शिंदे
आकोट : एक हात व पायाने दिव्यांग असलेला अकोला जिल्ह्यातील आकोट येथील धीरज कळसाईत या पहिल्या भारतीय दिव्यांगाने साऊथ ऑफ्रीकेतील माऊंट किलीमंजारो हे शिखर सर करुन भारताचा राष्ट्रध्वज फडकावल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे. याबद्दल धीरज कळसाईतला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने मेडल, प्रशस्तीपत्र व इतर साहित्य देऊन त्याचा गौरव केला आहे. त्याच्या कामगिरीची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतल्या गेल्याने महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब ठरली असून आकोट शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. विशेष म्हणजे किलीमंजारो शिखर सर करण्याकरिता परिस्थितीने हतबल असलेल्या धीरजची साहसकथा मतदतीचा हात या सदराखाली प्रसिध्द केली होती. त्यानंतर अनेक मदतीचे हात त्याला बळकटी देण्याकरिता पुढे आले होते. किलो मंजारो हा आफ्रीका खंडातील सर्वात उंच पर्वत टांन्झानिया देशातील इशान्य भागात केनियाच्या सिमेवर असलेल्या या शिखराची उंची 19 हजार 341 फुट आहे. विशेष म्हणजे पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत असून बहुतांश भाग बर्फाळ असल्याने हिमख्लन होत असते. तसेच या पर्वताची सरळ उभी असल्याने वातावरणातील तापमान व जोराने वाहणारे वारे याचा सामना करीत धीरज कळसाईतने हे शिखर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पहाटे सर केला. शिखरावर पोहचल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनीटात पूर्वतयारीनिशी गेलेल्या धीरजने भारत माता की जय, जय महाराष्ट्र , जय जिजाऊ, जय शिवाजी, जय भवानीच्या जयघोषात प्रजासत्ताक दिनी पहाटे भारताचा तिरंगा फडकविला. सोबतच महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असलेला भगवा ध्वज फडकविला. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन केले. धीरज शारिरीकदृष्ट्या दिव्यांग असला तरी आपल्या साहसीवृत्ती व हिमतीने किली मंजारो हे हिमशिखर सर केले. धीरज ने यापुर्वी कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावन खिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड, वजीर सुळका अशा शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. धिरज कळसाईतच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असुन आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. वडील मजूरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. धिरजने मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आधीच जन्मापासून डावा हात मनगटापासून नसल्याने त्याचा जीवन जगण्याचा संघर्ष असतांनाच काही वर्षांपासून अपघातात त्याला आपला एक पाय गमवावा लागला होता. शरिरात दिव्यांग आले असले तरी मात्र त्याने आत्मविश्वासाच्या भरवशावर गिर्यारोहणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात उंच भरारी घेतली असून त्याचे जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द मनाशी बाळगुण आहे. नुकतीच त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने नोंद घेतल्याबद्दल त्याचे कौतूक होत आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याकरिता धिरजला विनोद हरिभाऊ सुरडकर, बधिरीकरण शास्त्र तज्ञ डॉ.राजेंद्र सोनोने, बालरोग तज्ञ डॉ.अंजली सोनोने यांनी त्याला मार्गदर्शन केले.