सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रब्बी हंगामात अनुदानित हरभरा बियाण्याचा प्रचंड काळाबाजार करण्यात मोठा सहभाग असताना महाबीज, कृषी विभागाने कोणतीच कारवाई न केलेल्या चार वितरकांनाच चालू खरीप हंगामात शेतकर्यांना अनुदानित दरावर वाटप करावयाचे सोयाबीन, तूर, मूग, उडिदाचे बियाणे विक्रीसाठी देण्यात आले आहे. त्यातच बियाणे वाटपात अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकर्यांना २५, तर इतर शेतकर्यांना ७४ टक्के वाटप ठरवून दिल्याने महाबीजच्या या टक्केवारीचा वापर कसा होणार, ही बाब गोंधळ निर्माण करणारी आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य) अंतर्गत तूर, मूग, उडीद व राष्ट्रीय गळितधान्य तेलताड अभियानांतर्गत सोयाबीन पिकाचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. राज्य बियाणे महामंडळाकडून या बियाण्यांचे लाभार्थींंना वाटप होणार आहे. त्यासाठी महाबीजने वितरकांना वाटपासाठी बियाणे दिले आहे, तर लाभार्थी निवड करून परमिट देण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे आहे. महाबीजने अनुदानित बियाणे अकोला शहरातील चार वितरकांकडे ठेवले आहे. त्यांची नावे पाहिल्यास महाबीजच्या बियाणे वाटपातील हेतूबद्दलच शंका निर्माण होत आहे. रब्बी हंगामात अनुदानित हरभरा विक्रीसाठी ज्यांच्याकडे ठेवले होते, त्यापैकी काहींनी प्रचंड काळाबाजार केला. त्यामध्ये पाच ते सहा कृषी केंद्र संचालकांनी केलेला गोंधळ उघडही झाला. मात्र, कारवाईच्या मुद्यांवरूनच जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, राज्याचा कृषी विभाग आणि महाबीजने गोंधळ घालून काहीच हातात पडले नसल्याचे सांगत पांघरूण घातले. आता महाबीजने अकोला शहरातील त्याच चार वितरकांना खरिपात अनुदानित बियाणे वाटपासाठी दिले आहे. त्यामुळे महाबीजचा त्यांच्यावर असलेला कमालीचा विश्वास स्पष्ट होत आहे. सोयाबीन बियाणे चार हजार रुपये क्विंटलअनुदानित सोयाबीन बियाणे प्रतिक्विंटल ३५00 ते ४000 रुपये दराने शेतकर्यांना मिळणार आहे. ३0 किलोची बॅग १000 ते १२00 आणि ४0 किलोची बॅग १४00 रुपयाला मिळणार आहे. दोन किलो तूर १९0 रुपये, उडीद २४0 रुपये, मूग २७0 रुपयांत देण्याचे महाबीजने वितरकांना सांगितले आहे. लाभार्थींंची अन्यायकारक टक्केवारीमहाबीजने बियाणे वाटप करण्यासाठी लाभार्थींंची सामाजिक टक्केवारीही ठरवून दिली आहे. त्यामध्ये उपलब्ध अनुदानित बियाणे ७४ टक्के इतर लाभार्थींंना, १८ टक्के अनुसूचित जाती, ७ टक्के अनुसूचित जमातींच्या लाभार्थींंना वाटपाचे प्रमाणही ठरवून दिले. या प्रमाणात वाटप झाल्यास ते अन्यायकारक ठरणार असल्याचे चित्र आहे.सोयाबीनचे जेएस-९३0५ नाकारले!अनुदानित दरावर उपलब्ध असलेले सोयाबीनचे जेएस-९३0५ बियाणे अकोला तालुक्यात नाकारण्यात येत आहे. कमी कालावधीचे या बियाण्याला तेल्हारा, अकोट तालुक्यात मागणी आहे. त्याचवेळी अकोल्यातील शेतकरी इतर वाणांची मागणी करीत आहेत. त्यामुळे बियाणे बदलवून देण्याची मागणी कृषी विभागाने महाबीजकडे केली आहे.अनुदानित दराने वाटपाचे बियाणेमहाबीजने अनुदानित दरावर वाटप करण्यासाठी बाजारात उपलब्ध करून दिलेल्या बियाण्यांमध्ये तूर पीकेव्ही तारा, बीडीएन-७0८, विपुला, मूग बीएम-२00२-१, बीएम-२00३-0२, पीकेव्हीएम-४, उडीद एकेयू-१५, तर सोयाबिन जेएस-९३0५, एमयूएस-७१, एमयूएस-१५८, जेएस-९५६0, एमयूएस-१६२, फुले अग्रणीचा समावेश आहे.मंडळ अधिकारी स्तरावर परमिट वाटपशेतकर्यांना अनुदानित दराने बियाणे वाटप करण्यासाठी कृषी विभागाने मंडळ अधिकारी स्तरावर परमिट देणे सुरू केले आहे. त्यातच व्यापक प्रसिद्धी नसल्याने गावपातळीवर त्याची माहितीही नाही. कृषी सहायकांनी दिलेल्या नावाचीच परमिट तयार होण्याची भीती त्यातून निर्माण झाली आहे.
अनुदानित बियाणे घोटाळेबाजांच्या हातात
By admin | Published: June 19, 2017 4:40 AM