अकोला, दि. २१- अनेकांना समाजासाठी काहीतरी वेगळे करावे, असे मनोमन वाटत असले, तरी मदत करण्याची भावना बर्याचदा मनातच राहते; परंतु भारत एक कदम संस्थेने माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू करून अकोलेकरांना गोरगरीब, गरजूंच्या मदतीची एक संधी उपलब्ध करून दिली आणि पहिल्याच दिवशी माणुसकीच्या भिंतीकडे शेकडो सहृदयी दानशूरांनी मदतीचे हात पुढे केले. अनेकांच्या घरी चांगल्या व सुस्थितीतील कपडे असतात. लहान मुलांची खेळणी, चपला, जोडे, चादर, ब्लँकेट याशिवाय इतरही काही वस्तू असतात; परंतु आम्ही एकतर या वस्तू फेकून देतो किंवा जाळून टाकतो; परंतु कपड्यांचा, आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा गोरगरीब, गरजूंना काही उपयोग होऊ शकतो का, याचा आम्ही विचारच करीत नाही. भारत एक कदम संस्थेने हा विचार करून कपडे, खेळणी, चपला, जोडे, चादर, ब्लँकेट या वस्तू गोळा करून त्या गोरगरीब व गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम सुरू केला. गुरुवारी या उपक्रमाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उद्घाटन केले. यावेळी मंचावर भारत एक कदम संस्थेचे संचालक व माणुसकीच्या भिंती उपक्रमाचे संयोजक अरविंद देठे, प्रसिद्ध उद्योजक देवराव कापडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, डॉ. कमल देठे उपस्थित होते. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी समाजामध्ये दरी निर्माण होत आहे, ही दरी माणुसकीच्या विचारांनीच मिटविल्या जाऊ शकते. समाजामध्ये अनेक वंचित घटक आहेत. त्यांच्या मदतीसाठी सर्वांंनी पुढे आले पाहिजे. द्वेषाच्या भिंती तोडून माणुसकीच्या भिंती उभारण्याची समाजात गरज आहे, असे सांगत, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गोरगरीब, गरजूंसाठी सुरू केलेल्या उपक्रमात सर्वांंनी कपडे, खेळणी व इतर साहित्य देऊन मदत करावी, असे आवाहन केले. अरविंद देठे यांनी मनोगत व्यक्त करताना, सामाजिक बांधीलकी म्हणून आम्ही माणुसकीच्या भिंतीचा उपक्रम सुरू केला. कार्यक्रमादरम्यान अस्पायर संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे, अँड. सुधाकर खुमकर, गणेश पोटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, शौकतअली मीरसाहेब, अनिल माहोरे, संजय चौधरी, भारती शेंडे, पुरुषोत्तम मालाणी, मनीष सेठी, प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व उमेश सापधारे आदींनीही विचार मांडले.
माणुसकीच्या भिंतीला मिळाले मदतीचे हात..
By admin | Published: October 22, 2016 2:44 AM