अकोला : वारंवार मागणी करूनही जीएसटी नेटवर्क पोर्टलची क्षमता वाढविल्या जात नसल्याने महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोर्टल हँग होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. शुक्रवारी जीएसटी पोर्टल हँग झाल्याने अनेकांना जीएसटीआर-वनचा परतावा भरणा करता आला नाही. सरकारच्या ढिसाळ यंत्रणेमुळे व्यापारी-उद्योजकांना विनाकारण लाखोंचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जीएसटीआर-वनचा परतावा भरणा करावा लागतो; मात्र २९ जानेवारीपासूनच जीएसटी पोर्टलची स्पीड सातत्याने कमी होत गेली. ३१ जानेवारीला तर पूर्ण सिस्टमच कोलमडली. जीएसटीआर-वनचा परतावा भरणा अपलोड होऊ न शकल्याने अनेकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या आधीदेखील असे प्रकार झाले. त्यावर पर्याय म्हणजे जीएसटी पोर्टलची क्षमता वाढविणे हा एकमेव उपाय आहे. शेवटच्या चरणात एकाच वेळी जीएसटीआर-वनचा परतावा भरणा करण्याची गर्दी होत असल्याने पोर्टल हँग होते.