रोहणखेड: सावरा फीडर अंतर्गत येणाऱ्या रोहणखेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून काही भागात जिवंत वीजतारा लोंबकळल्या आहेत. लोंबकळलेल्या वीजतारा अद्याप दुरुस्त करण्यात आल्या नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
महावितरणच्या दुर्लक्षतेमुळे गावात घरांच्या छताच्या समोरून जिवंत वीजतारा गेल्या आहेत. अपघाताची शक्यता पाहता महावितरणने उपाययोजना केल्या नसल्याचे चित्र आहे. गतवर्षी २ सप्टेंबर रोजी वीजतारांना स्पर्श झाल्याने ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरीही अद्यापपर्यंत वीजतारांसाठी उपाययोजना केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. गावात दुसरी घटना होऊ नये, यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो )
----
महावितरणला अनेकदा लोंबकळणाऱ्या वीजतारांबाबत तक्रार देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली; मात्र कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
- राजू जगन्नाथ झामरे, नागरिक, रोहणखेड