अकोला : अल्पवयीन मुलींना त्रास देणाऱ्या शिवर मधील दाेघांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पोस्को कायद्यांतर्गत दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा ठाेठावली आहे. अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला.
पीडित मुलगी ही तिच्या मैत्रिणीसोबत २६ जानेवारी २०१७ राेजी शाळेतून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून परतत असताना शिवर मधील वृंदावन नगरातील रहिवासी राम राजेंद्र महल्ले (२२) व शुभम गोपाल काकड (२२) या दाेघांनी त्यांना रस्त्यात अडविले. या दाेन्ही मैत्रिणींच्या भाेवती माेटारसायकल फिरवत त्यांना घाबरविले. हे दोघेही पीडिता व तिच्या मैत्रिणींना शिवकवणीला जात असताना त्यांचे मागे जात होत व त्यांना विनाकारण त्रास देत होते. १३ जुलै २०१७ रोजी सकाळी वाजता पीडित मुलगी ही एकटी तिच्या घरून तिच्या मामाच्या घरी शिवर येथे सायकलने जात असताना राम महल्ले याने तिच्या सायकलच्या समाेरच्या कॅरिअरमध्ये चिठ्ठी टाकली व निघून गेला. या प्रकाराने त्रस्त झालेल्या पीडितेने ही संपूर्ण हकिकत ९ मे २०१७ रोजी रोजी तिच्या आई-वडिलांना सांगितली. यानंतर पीडिताच्या वडिलांनी राम महल्ले याला विचारले असता त्याने तिच्या वडिलांसोबत भांडण करून शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पीडितेच्या वडिलांनी १० मे २०१७ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पीडितेच्या नावाने दोघांविरुद्ध तक्रार दिली.
पाच हजाराचा दंडही ठाेठावला.
या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र सादर करण्यात आले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने राम राजेंद्र महल्ले व शुभम गोपाल काकड या नराधमांना पास्को व भादंविच्या विविध कलमाने दोषी ठरवून प्रत्येकी तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने प्रत्येकी साधी कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील श्याम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी एल. पी. सी. अनुराधा महल्ले व एल.पी सी. सोनू आडे यांनी सहकार्य केले.