अकोला : महिलांचा छळ अनेक वर्षांपासून हाेत असल्याचे आपण नेहमीच ऐकताे. काेराेनाच्या काळात या प्रमाणात वाढही झाली, परंतु या काळात पुरुषांचाही छळ झाल्याच्या तक्रारी पाेलीस विभागाकडे आहेत. पत्नीकडून होत असलेल्या छळाविरुद्ध पुरुषांच्या तक्रारीचे प्रमाण कमी असले, तरी महिलांचा छळच माेठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.
काेराेनाच्या काळात सर्व कामधंदे बंद असल्याने अनेक जण घरी आहेत. त्यामुळे आपोआप कुटुंबातील संवाद वाढला. या संवादाचा काहींनी चांगला उपयाेग करून घेतला, तर काहींच्या कुटुंबामध्ये वाद झाला. जिल्ह्यात २०१८ मध्ये ११ तक्रारी पुरुषांनी केल्या असून, त्या तक्रारीनुसार पत्नी शिवीगाळ करते व मारहाण करीत असल्याचा आहेत, तर २०१९ मध्ये १३ पुरुषांनी पत्नीविरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४४३ तक्रारी या २०२० व जुलै, २०२१ पर्यंत प्राप्त आहेत. यामध्ये पुरुषांच्या महिलेविरुद्ध १४ तर महिलेच्या पुरुषाविरुद्ध ४२९ तक्रारींचा समावेश आहे. शहरातील अनेक समाजसेवकांनी अनेक प्रकरण आपसात केले आहे, तर पाेलीस विभागाकडून १३० प्रकरणांत सामंजस्य केले असल्याची नाेंद आहे.
बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी
२०१८ - ११
२०१९ - १३
२०२० - १०
२०२१ - ०४
मानसिक छळच नव्हे, तर मारहाणही होते
पुरुषांनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी त्यांचा मानसिक छळच करीत नसून, पतींना मारहाणही करीत असल्याची माहिती आहे. अनेक प्रकरणांत पत्नी दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावरूनच अधिक वाद होत असल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे, तर काही प्रकरणांत पती कामावर जात नाही, म्हणून पत्नीकडून छळ होत असल्याच्याही तक्रारी आहेत.
आर्थिक टंचाई आणि अति सहवास
काेराेना संसर्गामुळे काेणतेही काम नाही. घरात सर्वांशी अति सहवास वाढला. या सहवासातून घरी बसल्या बसल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवणे सुरू झाले. सहवास वाढल्याने भांडणेही वाढल्याचे दिसून येते. आर्थिक अडचणीतूनही वाद मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
डॉ.अमोल केळकर
मानसोपचार तज्ज्ञ अकोला
१३० कुटुंबांची संसारवेल पुन्हा फुलली
काेराेनाच्या काळात सर्वच जण घरी, त्यातून अनेकांचे भांडणे झालीत, तर काहींनी सहवास वाढल्याने आनंदात वेळ घालविला. २०२० व २१ मध्ये महिलांच्या पुरुषाविरुद्ध व पुरुषांच्या महिलांविरुद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. यापैकी महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या साहाय्याने १३० जणांमध्ये सामंजस्य करण्यात आले. यामध्ये २०२० मध्ये १०३ तर चालू वर्षात मे महिन्यापर्यंत २७ प्रकरणांचा समावेश आहे. हे १३० कुटुंब व्यवस्थित जीवन जगत असून, पुन्हा याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.
भांडणाची ही काय कारणे झाली?
काेराेनाच्या काळात अनेक जण घरीच असल्याने सहवास वाढला, यातून विविध खाद्यपदार्थांची फर्माइश वाढली. ती पूर्ण न केल्याने, पत्नी माेबाइलवर जास्त वेळ राहते, म्हणून भांडण वाढले. दारू पिऊन येऊन घरात धिंगाणा घातल्या जात असल्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.