अकोला: अकोला शेतकरी व बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी गुजरातमधील पाटीदार युवा नेते हार्दिक पटेल यांची जाहीर सभा शुक्रवार २३ मार्च रोजी अकोल्यातील नवीन बसस्थानकासमोरील स्वराज्य भवन येथे संध्याकाळी ६ वाजता होत असल्याची माहिती विदर्भ युथ फोरमचे अध्यक्ष मंगेश भारसाकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात त्रस्त शेतकरी व बेरोजगार युवक यांनी हार्दिक पटेल यांच्या सभेस मोठ्या प्रमाणात उपस्थिती लागणार असल्याचा दावाही आयोजकांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यात अडीच लाख प्रशासकीय पदे रिक्त असतानाही सरकार ही पदे भरण्यास टाळाटाळ करीत आहे. निवडणूक प्रचारात शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या दीडपट नफा देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र दीडपट नफा तर सोडाच योग्य हमीभावही मोदी सरकारने शेतकºयांना दिला नाही. त्यामुळे शेतकरीही मोदी सरकारवर प्रचंड नाराज आहेत. हार्दिक पटेल यांची जाहीर सभा एल्गार मेळावा या नावाने संपन्न होत आहे. हा कार्यक्रम विदर्भ युथ फोरमने आयोजित केला असून, हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. शेतकरी व बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे राहणार आहेत. डॉ. सुधीर ढोणे हे केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या जनहित विरोधी धोरणांवर नेहमीच तुटून पडतात. जनतेचा आक्रोश व जनतेवर होणारा अन्याय त्यांच्या माध्यमातून नेहमीच व्यक्त होत असतो. पत्रकार परिषदेस विदर्भ युथ फोरमचे उपाध्यक्ष सय्यद वासिफ, सचिव माणिक शेळके, जिल्हाध्यक्ष डॉ. मनीष खंडारे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रेम गावंडे जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश गोंड उपस्थित होते.