मूर्तिजापूर: विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाषणादरम्यान आमदार पिंपळे यांची वाणी घसरली आणि त्यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करून अवमानजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने एकत्र येऊन मूर्तिजापूर येथे तिडके नगरमध्ये निषेध सभा घेतली. या वेळी सकल मराठा समाजाच्या बॅनरखाली एकत्र येत मराठा समाज बांधवांनी तीव्र शब्दात निषेध करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी आमदार हरीश पिंपळे यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. सभेत अकोल्याचे मनीष मोहोड, पंकज जायले, मंगेश काळे, दिलीप बोचे, आशीष पवित्रकार, किशोर मानकर यांच्यासह या तालुक्यातील व बार्शीटाकळी तालुक्यातील शेकडो समाजबांधव उपस्थित होते. पिंपळे यांच्या वादग्रस्त विधानाने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊन एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी डॉ. पुरुषोत्तम तायडे, पंकज जायले, डॉ. संजय धोत्रे, पवन महल्ले, डॉ. अशोक ओळंबे, मंगेश काळे व इतर उपस्थित होते. दरम्यानया संदर्भात आमदार हरिष पिंपळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचला नाही. पिंजर येथेही निषेधजिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याविषयी आमदार हरीश पिंपळे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा पिंजर येथील डॉक्टर असोसिएशनने निषेध केला आहे.आ. पिंपळे यांनी मूर्तिजापूर येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य केले. त्यामुळे डॉक्टर लोकांच्या भावना दुखावल्या असून, याचा निषेध करण्यात आला. यावेळी डॉ. शरदचंद्र लहाने, डॉ. राठोड, डॉ. गुल्हाने, डॉ. खान, चिल्होरकर, डॉ. एन. बी. पोटे, डॉ. नरेश इंगोले तथा डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
वादग्रस्त वक्तव्यामुळे हरीश पिंपळे अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:59 PM