निपानाचे कृषी सहायक , सेवक सापडता सापडेना .
समाधान वानखडे, वणी रंभापूर : अकोला तालुक्यातील ग्राम निपाना येथील कृषी विभागाच्यावतीने कृषी सेवक, कृषी सहायक यांनी गेल्या काही दिवसांपासून दांडी मारत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
खरीप पिकांच्या हंगामातील पेरणी लवकरच सुरू होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना निपाणा गाव परिसरात यावर्षी बी-बियाणे खत, फवारणी औषधे कीटकनाशके किती प्रमाणात वापरणे यावर योग्य जमिनीची निवड करणे यासाठी मार्गदर्शन हवे. मृग नक्षत्र लागला तरी, शेतकरी वर्ग या मार्गदर्शनापासून वंचित आहे. गेल्या काही महिनाभरापासून कृषी सहायक, कृषी सेवक हे शेतकऱ्यांना दिसले नसल्याने ग्रामपंचायतने याबाबत ठरावसुध्दा मंजूर केला आहे, अशी माहिती शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य रूपराव इंगळे यांनी दिली. लवकरच शेतकरी वर्गाकडून कृषी सहायक, सेवक कर्मचारी दाखवा, बक्षीस मिळवा, असा उपक्रम राबविण्याचे नियोजन सुरू आहे. याकडे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
गावातील शेतकऱ्यांना शेतकरी बचत गटाला कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांची माहिती मिळावी. सोबत कृषीविषयक माहिती मिळण्यासाठी व गावाला योग्य वेळ देण्यासाठी सदरच्या विभागाने कर्मचारी द्यावा, असा ग्रामपंचायतमार्फत दोन वेळा ठराव मंजूर केला आहे.
- कुमुदिनी इंगळे, सरपंच निपाना