मूर्तिजापूर/हातगाव (जि. अकोला), दि. २९: अकोला जिल्हा परिषदेच्या हातगाव मतदारसंघाच्या २८ ऑगस्ट रोजी झालेल्या पोटनिवडणुकीतील मतमोजणी २९ ऑगस्टला शासकीय धान्य गोडावून क्र. १ येथे होऊन त्यात भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे हे अवघ्या ७३ मताधिक्याने विजयी झाले आहेत. हातगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील यापूर्वीचे भारिप-बमसंचे सदस्य रवींद्र गोपकर यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ ऑगस्टला मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यात ४७.७0 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी २९ ऑगस्ट रोजी पार पडली. त्यात भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी ३३९५ मते मिळवली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विनोद सदाफळे यांना ३२६८ मते मिळाली. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांना ९४२ तर अपक्ष सुरेश गोपकर यांना १0२५ मते मिळाली आहे. सर्वाधिक मते मिळविणारे भारिपचे सम्राट डोंगरदिवे हे ७३ मतांनी आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या निवडणुकीत सम्राट डोंगरदिवे यांनी मिळविलेल्या विजयाने भारिप-बमसंने आपली जागा कायम राखली आहे. तथापि, शिवसेनेच्या विनोद सदाफळे यांनी त्यांना काट्याची टक्कर दिली. दिवंगत जि.प. सदस्य रवींद्र डोंगरदिवे यांचे बंधू सुरेश गोपकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून तिसर्या क्रमांकाची मते घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. भारिपचे संख्याबळ २५ वर! भारिप बहुजन महासंघाने विजय मिळवित ही जागा कायम राखली. त्यामुळे सत्ताधारी पक्ष असलेल्या भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा परिषदेतील सदस्यांचे संख्याबळ आता २५ वर पोहोचले आहे. एकूण ५२ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी भारिप-बमसंचे यापूर्वी २४ सदस्य होते. हातगाव सर्कलच्या जागेवर विजय मिळविल्याने, पक्षाचे जिल्हा परिषदेतील सदस्यांचे संख्याबळ २५ झाले आहे.
हातगाव जि.प. मतदारसंघ भारिप-बमसंने राखला !
By admin | Published: August 30, 2016 2:14 AM