लोकमत न्यूज नेटवर्कहातरुण : हातरुण परिसरात रेतीची वाहतूक खुलेआम सुरू असताना महसूल विभागाने दोन वाळूची वाहने पकडून ३१ हजार रुपये दंड ठोठावला. जप्त करण्यात आलेली वाळूची वाहने शिंगोली येथील पोलीस पाटील संतोष बोर्डे यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती हातरुण तलाठी दत्तात्रय काळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.हातरुण येथील तलाठी कार्यालयासमोरून वाळूची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. पहाटेच्या वेळेस अवजड वाहनात वाळू भरून ही वाहने जाताना सर्रास दिसून येतात. या वाळू वाहतुकीला लगाम लावण्याची मागणी नागरिकांनी तलाठी काळे यांच्याकडे केली होती. हातरुण महसूल विभागाच्या पथकाने दोन वाळू वाहनांवर कारवाई करीत ३१ हजार रुपये दंड ठोठावला आहे. कवठा बहादुरा येथून हातरुण मार्गे ही वाळू वाहतूक होत असून, एम. एच. २८ बी. ९0७३ या वाहनात एक ब्रास वाळू अंदाजित किंमत पंधरा हजार आठशे तेहत्तीस रुपये आणि एम. एच. ३0 ए.बी. १९८१ वाहनात एक ब्रास वाळू अंदाजित किंमत पंधरा हजार आठशे तेहत्तीस रुपये असा एकूण एकतीस हजार सहाशे सहासष्ठ रुपये दंडाची कारवाई महसूल विभागाच्या अधिकार्यांनी केली. हातरुण महसूल विभागाच्या या पथकात मंडळ अधिकारी मेश्राम, हातरुण तलाठी काळे, हाता २ चे तलाठी दिवाकर ताले, हाता तलाठी धम्मपाल नकाशे यांचा समावेश होता. महसूल विभागाने दंडाची कारवाई केलेली दोन्ही वाहने शिंगोली पोलीस पाटील संतोष बोर्डे यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. हातरुण, कारंजा, बोरगाव वैराळे, मालवाडा, हाता येथून वाळू वाहतूक होताना दिसल्यास दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे हातरुण मंडळ अधिकारी मेश्राम यांनी सांगितले.
रस्ते गेले खड्डय़ात!वाळू वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असल्याने वाहनांची रस्त्यावरून स्पर्धाच लागलेली दिसून येते. परिसरातील रस्ते जड वाहतुकीमुळे खड्डय़ात गेले आहेत. हातरुण येथील शाळेसमोरूनच ही वाहने धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.