जिल्ह्यात पुन्हा एकदा संसर्गजन्य काेराेनाचा विळखा घट्ट हाेत चालला आहे. ग्रामीण भागासह शहरात काेराेनाची लागण हाेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. रुग्णसंख्येचा आलेख असाच वाढत राहिल्यास वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण येणार हे निश्चित आहे. काेराेनाच्या अनुषंगाने मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धाेत्रे यांनी आराेग्य यंत्रणेतील अधिकारी व भाजप लाेकप्रतिनिधींसाेबत सविस्तर चर्चा केली. काेराेनाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेने रुग्णालयात मूलभूत साेयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धस्तरावर काम करण्याची गरज आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधांचा अभाव, डाॅक्टरांची पुरेशी संख्या नसल्यामुळे टाळाटाळ करीत असल्याची परिस्थिती आहे. यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे. याकडे प्रशासकीय यंत्रणांनी बारकाइने लक्ष देण्याचे निर्देश ना. संजय धाेत्रे यांनी दिले. जिल्ह्यात काेराेनाच्या वाढत्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त करीत ना. धाेत्रे यांनी जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, आ. हरीश पिंपळे व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली.
लक्षणे दिसल्यास चाचणी करा
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मार्च महिन्यापासून ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक व दुर्धर व्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी लसीकरण माेहीम राबविली जात आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन ना.संजय धाेत्रे यांनी यावेळी केले. सर्दी, खाेकला ताप व थकवा आदी लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.