एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत आजी, माजी आमदार व खासदारांना मोफत प्रवासाची सवलत देणारे परिपत्रक तत्कालीन परिवहनमंत्री यांच्या काळात जारी करण्यात आले. राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्या सन्माननीय व्यक्ती विधान परिषद अथवा विधानसभेत निवडून आले आहेत, अशा आजी व माजी आमदारांना त्यांच्या पत्नी अथवा सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच अश्वमेध, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी व परिवर्तन बसमधून राज्यात तसेच आंतरराज्य मार्गावर विनामूल्य प्रवास करता येत आहे. जिल्ह्यातील आजी - माजी आमदार, खासदारांपैकी १९ जणांनीच या सवलतीने प्रवास केला आहे, तर एप्रिल २०२१पासून आतापर्यंत केवळ ९ जणांनीच प्रवास केला.
असा आहे आमदारांचा एसटी प्रवास
२०१९ ४२
२०२० १२
२०२१ १९
चारचाकीत फिरणाऱ्यांना कशाला हवी सवलत?
विधान परिषदेत किंवा विधानसभेत निवडून आलेल्या आजी आणि माजी सदस्यांना त्यांच्या पत्नी किंवा एका सहकाऱ्यासह एसटीच्या कोणत्याही प्रकारच्या बसमधून विनामूल्य प्रवासाची सवलत दिली जाते. ज्यांच्याकडे आलिशान गाड्या आहेत, असे लोकप्रतिनिधी बसचा वापर करणार नाहीत, असे माहीत असूनही त्यांना मोफत सुविधा कशासाठी?
- नितीन इंगळे, नागरिक
लोकप्रतिनिधींच्या कामाची धावपळ तसेच सातत्याने करावी लागलेली भ्रमंती यामुळे असे लोक निर्धारित वेळेत सुटणाऱ्या बसेसमधून प्रवास करतील कशाला? माजी आमदारांसाठी ही सुविधा योग्य असली तरी त्यांच्याकडूनही बसचा वापर अभावानेच होत असावा. याबाबतचा पुन्हा आढावा घेऊन गरजू घटकांना सवलतीचा लाभ मिळावा.
- सुधीर पाटील, नागरिक