सचिन राऊत / अकोला: अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीतील रॅलीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीमध्ये डायमीथोट या घातक रसायनाची वायुगळती शुक्रवारी सुरू झाली. सायंकाळी ही वायुगळती रोखण्यात आली; मात्र तोपर्यंत झालेल्या वायुगळतीने अकोलेकरांना प्रचंड दुर्गंधीचा सामना तीन दिवस करावा लागणार आहे.अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीतील तिसर्या फेजमधील रॅलीज इंडिया फॅक्टरीमध्ये कीटकनाशक तसेच रासायनिक खतासाठी लागणारे रसायन तयार करण्यात येते. फॅक्टरीमध्ये शुक्रवारी दुपारी डायमीथोट या घन स्वरूपातील रसायनाचे द्रव रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रक्रियेसोबतच हे रासायनीक द्रव्य बाटलीबंद करण्याचे कामही फॅक्टरीत सुरू होते; मात्र ही प्रक्रिया सुरु असताना तांत्रिक चुक घडल्याने अचानक वायुगळती सुरू होऊन प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडण्यास सुरूवात झाली. कंपनीच्या अधिकार्यांनी या प्रकाराची माहिती मनपाच्या अग्निशमण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाला तत्काळ दिली. अग्निशमन विभागाने पाण्याचे दोन बंब या फॅक्टरीसमोर तैनात केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन क्षेत्र अधिकार्यांनी फॅक्टरीची तपासणी सुरु केली. फॅक्टरीच्या अधिकार्यांनी ही प्रक्रिया तत्काळ थांबवली; मात्र उग्र दुर्गंधी पसरल्याने या ठिकाणी काम करणे कठीण झाले. मनुष्यासोबतच प्राण्यांसाठीही घातक असलेली ही वायुगळती सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास थांबली; मात्र तोपर्यंत या वायुगळतीची दुर्गंधी शहरात तसेच फॅक्टरीच्या १५ किलोमीटर परिसरातील खेड्यांमध्ये पसरल्याने खळबळ उडाली होती. आणखी तीन दिवस ही उग्र दुर्गंधी अशाच प्रकारे राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
फॅक्टरीतून घातक वायुगळती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2016 2:26 AM