अकोला: शाळांमध्ये २0 पेक्षा अधिक किंवा कमी वर्ग असलेल्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांना महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियमावली १९८१ मधील नियम २१(३) नुसार दर आठवड्याला चार ते दहा तास आणि त्यापेक्षा कमी वर्ग असलेल्या शाळेत ६ व १२ तास काम करून तासिका घ्यावी, असे बंधनकारक आहे. असे शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे; परंतु अनेक मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यातून अंग काढतात. त्यांच्या नावाने असलेल्या तासिका शिक्षकांवर ढकलतात. केवळ वेळापत्रकात या पदाधिकाऱ्यांच्या नावाने तासिका दाखविण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक तासिकाच घेत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियमावली १९८१ मधील नियम २१(३) पालन करणे गरजेचे आहे.त्यांनी वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या विषयांच्या तासिका नियमितपणे घेऊन अध्यापनाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे, वेळापत्रकानुसार कार्य न करणाºया व कार्यात कसूर करणाºया मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांविरुद्ध नियमांतर्गत तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश संबंधित संस्था चालकांना द्यावेत, असेही शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापकांना तासिका घेणे बंधनकारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:47 PM