- नितीन गव्हाळे
अकोला : शालेय विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी विविध प्रयोग करावेत. हसत खेळत विद्यार्थ्यांना शिकवून कठीण वाटणारा विषय सोपा करून सांगता यावा, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत निवडक प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षकांना आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये राज्यातून अकोला जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षकांनी अव्वल स्थान प्राप्त केले. यासोबत औरंगाबाद जिल्ह्याने दुसरे, सांगलीने तिसरे तर परभणी जिल्ह्याने चौथे आणि गोंदिया जिल्ह्याने पाचवे स्थान प्राप्त केले. पहिल्या दहामध्ये विदर्भातील सहा जिल्ह्यांनी स्थान मिळविले, हे विशेष.जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. विद्यार्थी कॉन्व्हेंट संस्कृती सोडून पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळले पाहिजे. या दृष्टिकोनातून शिक्षकांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व विद्या प्राधिकरणामार्फत राज्यातील शाळांमध्ये कार्यरत मुख्याध्यापक आणि प्रत्येकी दोन शिक्षकांना आॅनलाइन अविरत प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांकडून शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित काही विषयांचे प्रश्न, काही प्रयोग देण्यात येतात. त्यांची सोडवणूक केल्यानंतर शिक्षक पुढील टप्पा गाठतात. अकोला जिल्ह्यातून या प्रशिक्षणासाठी ९५० शिक्षकांनी नोंदणी केली होती. पैकी ९४४ शिक्षकांनी अविरत प्रशिक्षण पूर्ण केले. राज्यात सर्वाधिक ९४ टक्के मुख्याध्यापक, शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यातील ८६ टक्के मुख्याध्यापक, शिक्षकांनी, सांगली जिल्ह्यातील ८५ टक्के मुख्याध्यापक, शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रभावीपणे अविरत प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान प्राप्त करता आले.पुढील अविरत प्रशिक्षण १४ नोव्हेंबरपासूनजिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक आणि प्रत्येकी दोन शिक्षकांना आॅनलाइन अविरत प्रशिक्षण १४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबरपर्यंत देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी ३0 दिवसांचा कालावधी आहे. त्यासाठी १४ नोव्हेंबरपासून प्रशिक्षणार्थींना अर्ज उपलब्ध आहेत.
यंदा अविरत प्रशिक्षणामध्ये जिल्ह्याने ९४ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनात राज्यात आम्ही अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पुढील प्रशिक्षणातसुद्धा हे सातत्य कायम राखू.- समाधान डुकरे, जिल्हा समन्वयक,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था
अविरत प्रशिक्षण यशस्वी राबविणारे जिल्हेअकोला- ९४ टक्केऔरंगाबाद- ८६ टक्केसांगली- ८५ टक्केपरभणी- ७९ टक्केगोंदिया- ७९ टक्केभंडारा- ७७ टक्केवर्धा- ७५ टक्केयवतमाळ- ७५ टक्केचंद्रपूर- ७४ टक्केजालना- ७३ टक्के