खामगाव (बुलडाणा): राज्यातील अमराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे पायाभूत ज्ञान होणे गरजेचे आहे. यासाठी या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांच्या मराठी भाषेच्या पायाभूत प्रशिक्षणाची जबाबदारी निरंतर शिक्षणाधिकार्यांकडे देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील अमराठी शिक्षकांना मराठी भाषेचे पायाभूत ज्ञान मिळावे, यासाठी ४ जून रोजी चिखली येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे. अमराठी शाळांमध्ये इयत्ता ८, ९ व १0 मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी २00६ पासून मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग योजना सुरुकरण्यात आली आहे. सन २0१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग योजनांसाठी सुधारित कार्यपद्धती, मानसेवी शिक्षकांची नियुक्ती आणि त्यांच्या मानधन तथा अभ्यासक्रमावर अंमलबजावणी करण्याच्या माहितीसाठी संपूर्ण राज्यात उपाययोजना केली जात आहे. या अंतर्गत मानसेवी शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी राज्यात जिल्हानिहाय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. बॉक्स अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने २७ एप्रिल २0१५ रोजी लागू केलेल्या परिपत्रकानुसार सुधारित योजनांवर अंमलबजावणी करण्यात येणार असून, सदर परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्षामध्ये योजनेचा कालावधी १ जुलै ते ३१ मार्च अशी ९ महिने राहील. मानसेवी शिक्षकांची नियुक्ती शिक्षणाधिकारी (निरंतर) द्वारे करण्यात येईल. इयत्ता ८, ९ तथा १0 मिळून १८0 ते २00 विद्यार्थ्यांसाठी एका मानसेवी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल; जर विद्यार्थ्यांची पटसंख्या २00 पेक्षा जास्त अथवा ३00 पेक्षा कमी असेल तर दोन मानसेवी शिक्षकांना नियुक्त करण्यात येईल. तसेच पुढे प्रत्येक १५0 विद्यार्थी संख्या असणार्या तुकडीसाठी एक मानसेवी शिक्षक नियुक्त करण्यात येईल. या शैक्षणिक वर्षापासून मानसेवी शिक्षकांना पाच हजार रुपये प्रति महिने मानधनाच्या स्वरूपात देण्यात येईल. नियुक्त केलेल्या मानसेवी शिक्षकांना वर्ग तथा परिपत्रकानुसार मराठी विषय शिकवावा लागेल.
मराठी भाषेच्या पायाभूत वर्गांसाठी मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण
By admin | Published: June 02, 2015 1:25 AM