अकोला: शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना सेवापुस्तिका, सेवापट विनामूल्य देण्याबाबत आणि त्यामध्ये नोंदी घेऊन त्या साक्षांकित करण्याबाबत शासनाने तरतूद केली आहे. यासोबतच शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्या निर्देशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनीसुद्धा शिक्षकांना सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचे मुख्याध्यापकांना बजावले आहे; परंतु मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाºयांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले असून, एकाही शिक्षकाला सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.सेवापुस्तिका हा प्रत्येक कर्मचाºयाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यामध्ये दरवर्षी वेतनवाढीसह कर्मचाºयाच्या नोकरीबाबत सर्व महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यात येतात. सेवापुस्तिका नसेल तर सेवानिवृत्ती, बदली, समायोजन करण्यास संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयाला अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना शिक्षक लाभापासून वंचित राहावे लागते. त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तरतूद केली आहे; परंतु शासनाच्या निर्णयाकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. शिक्षकांना सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत मिळत नव्हती. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या पगार वाढीची, यासह इतर नोंदीची माहिती मिळत नव्हती. ही समस्या राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मनीष गावंडे यांनी अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे मांडली. तसेच त्यांना निवेदन देऊन शिक्षकांना सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी पश्चिम वºहाडातील सर्वच प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना निर्देश देऊन शिक्षकांना सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत देण्यास बजावले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनीसुद्धा मुख्याध्यापकांनी शिक्षकांना सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचे निर्देश दिले; परंतु निर्देशांकडे कानाडोळा करीत मुख्याध्यापकांनी अद्याप एकाही शिक्षकाला सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत दिलेली नाही. ही प्रत शिक्षकांना देण्यात यावी, याविषयी राज्य खासगी प्राथमिक संघटना पाठपुरावा करणार आहे. (प्रतिनिधी)