अकोला : काेराेनाच्या कालावधीत क्षयरुग्णांना औषधाेपचाराखाली आणण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेता मनपाच्या वैद्यकीय आराेग्य विभागाच्या वतीने शहरातील ३५ हजार २२६ घरांना भेटी देऊन सुमारे १ लाख ५८ हजार ५१८ नागरिकांची आराेग्य तपासणी केली जाणार आहे. ३१ ऑक्टाेबरपर्यंत क्षय व कुष्ठराेग शोधमाेहीम राबवली जाणार असून, यादरम्यान मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांना वैद्यकीय आराेग्य अधिकारी डाॅ. अस्मिता पाठक यांनी आवाहन केले आहे.
शहरात काेराेना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण ७ एप्रिल २०२० राेजी आढळून आला हाेता. या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशातून टाळेबंदी लागू करण्यात आली हाेती. अद्यापही काेराेना संसर्गाची परिस्थिती कायम असल्याने यादरम्यानच्या कालावधीत क्षयरुग्णांच्या औषधाेपचाराकडे दुर्लक्ष झाले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर मनपाच्या वैद्यकीय आराेग्य विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ३१ ऑक्टोबरपर्यंत क्षयरोग व कुष्ठरोगाची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाच्या १० नागरी आरोग्य केंद्रांमधील १५,८५१८ लोकसंख्येची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ३५,२२६ घरे असून, प्रत्येक घरी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी व पुरुष स्वयंसेवक गृहभेटी देऊन आराेग्य तपासणीदरम्यान निदान झालेले क्षय व कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर औषधोपचार केले जाणार आहेत.
संसर्गाची साखळी खंडित करण्याचा उद्देश
काेराेनाच्या कालावधीत क्षयरुग्णांची संख्या वाढली किंवा नाही, याची आकडेवारी माेहिमेदरम्यान उजेडात येणार आहे. नवीन संशयित व कुष्ठरुग्ण शोधून संसर्गाची
साखळी खंडित करण्याचा मोहिमेचा उद्देश आहे. यादरम्यान, प्रशिक्षित पथकाद्वारे क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी केली जाणार असून, रुग्ण आढळल्यास मोफत औषधाेपचार केले जाणार आहेत.
ही लक्षणे आढळल्यास तपासणी करा!
व्यक्तीला दोन आठवड्यांपासून खोकला असणे, अचानक वजन कमी होणे, भूक मंदावणे, घशातून रक्त
पडणे, पूर्वी क्षयरोग होऊन गेला असल्यास तसेच तंबाखू, सिगारेट, दारूचे व्यसन तसेच मधुमेह असल्यास तपासणी करण्याची गरज आहे. सर्वेक्षणासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्यसेवक आदींची २९७ व्यक्तींचे १५९ पथक तयार करण्यात आले आहे.