अकोला : कीटकजन्य आजारांपैकी सर्वाधिक गंभीर असलेल्या डेंग्यू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. आरोग्य सेवा (हिवताप) अकोला मंडळांतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये गत दोन वर्षांपासून डेंग्यूचा कोणताही उद्रेक झाला नसून, यावर्षी आतापर्यंत केवळ ११ रुग्णांना डेंग्यू हा आजार झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.डेंग्यू या आजाराचा प्रसार ‘एडीस’डासाच्या मादीपासून होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे, साठविलेल्या पाण्यात या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. डेंग्यूची लागन झालेल्या रुग्णाला तीव्र स्वरूपाचा ताप येऊन रक्तातील प्लेटलेटस् कमी होतात. त्यामुळे अनेकदा हा आजार जीवघेणा सिद्ध होतो. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अकोला विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी केली जात आहे. अकोला विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये वर्ष २०१६ मध्ये डेंग्यू आजाराचा एकही उद्रेक झाला नसून, डेंग्यूचे ४५ रुग्ण आढळून आले होते. तर डेंग्यूमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. त्यानंतर २०१७ मध्ये डेंग्यूचे ७० रुग्ण आढळून आले होते. तर यावर्षीही डेंग्यूचा कोणताही उद्रेक झाला नाही, तसेच या आजाराने कोणताही मृत्यू झाला नव्हता. यावर्षी ७ मे पर्यंत डेंग्यूचा उद्रेक झाला नसून, आतापर्यंत पाचही जिल्ह्यांमध्ये केवळ ११ रुग्ण आढळून आले आहेत. ९ जून २०१६ पासून डेंग्यू हा आजार अधिसूचित (नोटीफायेबल) घोषित झालेला आहे. त्यानुसार सर्व शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने अकोला विभागात डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे.डेंग्यूची लक्षणेडेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाचा ताप, तीव्र डोके दुखी, सांधे दुखी, अंग दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, रक्तमिश्रीत शौच होणे, रक्तातील प्लेटलेटसची संख्या कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात.डेंग्यू आजार टाळण्यासाठी उपाययोजना*घराभोवती किंवा परिसरात पाणी साचू न देणे.* साचलेले पाणी वाहते करणे.* खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे.* झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे.* आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळणे.डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग सतत प्रयत्नशिल आहे. नागरिकांनी डेंग्यू टाळण्यासाठी डासांची पैदास होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. साठविलेले पाणी वाहते करणे व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळल्यास डासांच्या उत्पत्तीला आळा घालणे शक्य आहे. डेंग्यूची लागन झालेल्या रुग्णांनी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन वैद्यकीय सल्ला व उपचार करून घ्यावेत.
- डॉ. अभिनव भुते, सहायक संचालक, आरोग्य सेवा (हि.) अकोला.