अकोला: दिवाळीनंतर जिल्ह्यातील सर्वच कोविड केअर सेंटर बंद करण्यात आल्याने लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात येऊ लागले. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात झाल्याने आरोग्य विभागाने कोविड लसीकरणाकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे होम आयसोलेशनमधील रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असणारे बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्येच आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येते. सुरुवातीला आरोग्य विभागाकडून होम आयसोलेशनमधील रुग्णांशी नियमित संपर्क साधण्यात येत होता. दरम्यान १६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोविड लसीकरणास सुरुवात झाली. त्यामुळे आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष लसीकरणावर केंद्रित झाले. परिणामी होम आयसोलेशनमधील रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून बेफिकिरी बाळगण्यात येत असल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच बाजारपेठेतील सुपरस्प्रेडर व्यक्तींकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
हे आवश्यक
- होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियमांचे पालन करणे.
- आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या स्थितीची नियमित अद्ययावत माहिती घेणे.
- रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्याच्याशी संपर्क करणे.
- नियमित मास्कचा वापर, वारंवार हात धुणे.
- इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे.
अशी होतेय बेफिकिरी
रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही त्याला वेळेत कळविण्यात येत नाही. त्यामुळे नकळत तो अनेकांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा फैलाव होतो. अनेक रुग्णांचे नातेवाईक देखील इतरांच्या संपर्कात येत असल्याचे चित्र आहे. याकडे आरोग्य विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.