अकोला : कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र सरकारने जमाव टाळण्याचा आदेश आरोग्य विभागाला दिला आहे. त्यानुसार, आरोग्य विभागाचे बहुतांश नियोजित जनजागृती कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, काही कार्यक्रमांचे स्वरूप बदलण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर अद्यापही ठोस उपचार उपलब्ध नाहीत; पण आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास कोरोनाला पसरण्यापासून थांबविणे शक्य आहे. म्हणूनच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे गुरुवार, ५ मार्च रोजी आरोग्य विभागाला जमाव टाळण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने राज्यभरातील आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम रद्द केले आहेत.‘महिला दिन’ कार्यक्रमदेखील रद्द!जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे स्तन व गर्भाशय कर्करोगाविषयी जनजागृतीचे कार्यक्रम नियोजित होते. दरम्यान, ६ मार्च रोजी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.जनजागृतीचे स्वरूप बदलणार!‘कोरोना’मुळे गर्दी टाळण्यासाठी आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम रद्द करण्यात आले; परंतु त्यामुळे जनजागृती थांबणार नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जनजागृती उपक्रमांचे स्वरूप बदलून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्याबाबत सूचना केली आहे. त्यानुसार, नियोजित जनजागृती कार्यक्रम रद्द करण्यात आले. हे कार्यक्रम रद्द करण्यात आले, तरी जनजागृती सुरूच राहणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.