- प्रवीण खेतेअकोला: असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांचे निदान करून त्यांचा संपूर्ण उपचार व्हावा, या अनुषंगाने आरोग्य विभाग आता अशा रुग्णांवर डिजिटली वॉच ठेवणार आहे. पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एएनएम परिचारिकांकडे टॅब दिला जाणार असून, त्यामध्ये रुग्णाची संपूर्ण माहिती अद्ययावत केली जाणार आहे.राज्यात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांचे वेळीच निदान होऊन रुग्णांना योग्य उपचार मिळावा, यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गत वर्षभरापासून राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत जिल्हा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर रुग्णांची तपासणी करून, असंसर्गजन्य आजारांचे निदान करण्यात येत आहे. गुरुवारी केंद्र सरकारचा नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ चा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानुसार, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक या सारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग डिजिटल माध्यमांचा उपयोग घेणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत एएनएम परिचारिकांना टॅब देण्यात येणार असून, यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची नोंदणी केली जाणार आहे. रुग्णाला असंसर्गजन्य आजार असल्यास त्यावर संपूर्ण उपचार होईपर्यंत त्याची माहिती या टॅबमध्येच अपडेट केली जाणार आहे. पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत हा उपक्रम, राज्यातील ५० टक्के जिल्ह्यांमध्ये यशस्वी राबविण्यात आला आहे. यापूर्वी गत वर्षी अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमध्येही हा उपक्रम यशस्वी राबविण्यात आला आहे.कम्युनिटी हेल्थ आॅफिसरची होईल नियुक्तीया उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात कम्युनिटी हेल्थ आॅफिसरचे पद भरण्यात येणार आहे. त्यासाठी बीएमएस डॉक्टरची निवड केली जाणार आहे. यानंतर त्यांना ६ महिनांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांच्यावरच असंसर्गजन्य आजारांचे निदान व रुग्णांच्या सर्वांगीण उपचाराची जबाबदारी राहणार आहे.जिल्ह्यात पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत असंसर्गजन्य आजारांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. उपक्रमांतर्गत ‘एएनएम’कडे टॅब दिला जाणार असून, रुग्णाच्या संपूर्ण उपचारापर्यंतची माहिती त्यामध्ये अद्ययावत केली जाणार आहे. यापूर्वी हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये यशस्वी राबविण्यात आला आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला