शहरात मूलभूत सुविधांची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यांची झाडपूस केली जात नसल्यामुळे रस्त्यांवर माती साचल्याचे दिसून येते. शहराच्या मध्यवर्ती भागातील काही माेजके रस्ते व मनपा पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातील रस्ते वगळल्यास इतर रस्त्यांकडे सफाई कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, मुख्य नाले, प्रभागातील अंतर्गत नाल्यांची साफसफाई हाेत नसल्यामुळे सांडपाण्याची समस्या निर्माण झाली असून, डासांची पैदास वाढली आहे. प्रभागांमध्ये ठिकठिकाणी काटेरी झुडपे वाढली आहेत. धुळीमुळे सर्वसामान्य अकाेलेकरांना श्वसनाचे विकार जडत असताना यासर्व प्रकाराकडे महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह महापाैर अर्चना मसने यांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन व सत्ताधारी पक्षाकडून मूलभूत सुविधांची पूर्तता व्हावी,अशी अकाेलेकरांची मागणी आहे. नागरिकांमधील नाराजीचा सूर लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस यांनी साफसफाईच्या कामासाठी आता आराेग्य निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
झाेन अधिकाऱ्यांना कर्तव्याचा विसर
मनपा प्रशासनाने मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी शहरातील चारही झाेनमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पूर्व झाेनची जबाबदारी दिलीप जाधव, पश्चिम झाेन- राजेंद्र टापरे, उत्तर झाेन-विठ्ठल देवकते व दक्षिण झाेन येथे देवीदास निकाळजे यांच्याकडे साेपविली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभागात फेरफटका मारल्यास सफाई कर्मचारी व आराेग्य निरीक्षक काेणते दिवे लावतात, हे दिसून येइल. तसे हाेत नसून झाेन अधिकाऱ्यांनाच कर्तव्याचा विसर पडल्याचे दिसत आहे.