लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदरीमुक्त राज्य करण्याची मोहीम सुरू आहे. यामध्ये अकोला महापालिका आघाडीवर असून, त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे पथक ३० जून ते ५ जुलै १७ पर्यंत अकोल्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच केंद्राचे पथक अकोल्यात येणार आहे. राज्याचे पथक अकोला दौऱ्यावर येत असल्याने बुधवारी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत डॉ. फारूख शेख यांचा गुड मॉर्निंग पथकातील हलगर्जीपणा समोर आल्याने डॉ. फारूख यांना तातडीने निलंबित करण्यात आले.अकोला महापालिका हद्दीत उघड्यावर शौचालय करण्यास प्रतिबंध घालण्यात आले असून, याप्रकरणी महापालिकेच्यावतीने कारवाई सुरू झाली आहे. वीस प्रभागांत वीस गुड मॉर्निंग पथक कार्यरत असून, दररोज पहाटे हे पथक कारवाईसाठी जात आहे. आतापर्यंत महापालिकेने २८ व्यक्तींवर कारवाई केली असून, २७०० रुपये दंड वसूल केला आहे. पोलीस ठाण्यात अशा दोषींना बसवून समज देऊन सोडण्यात येत आहे. झोननिहाय प्रत्येक आरोग्य निरीक्षक आणि अधिकाऱ्यांना हे काम सोपविले आहे. प्रभागात व्यक्ती उघड्यावर शौचास आढळून आल्यास तेथील मनपाच्या जबाबदार अधिकाऱ्याचे वेतन कपात करण्याचेदेखील आयुक्तांनी निर्देश दिले होते. बुधवारी याप्रकरणी आढावा घेतला तेव्हा डॉ. फारूख यांचा हलगर्जीपणा प्रकर्षाने जाणवला, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. सोबतच कंत्राटी अभियंता प्रशांत मगर यांची सेवा हलगर्जीपणामुळे समाप्त करण्यात आली. सुरक्षारक्षक अजय विटे व चक्रनारायण यांचे एक महिन्याचे आणि आरोग्य निरीक्षक आशिष इंगोले शेख रेहमान यांचे १५ दिवसांचे वेतन कापण्यात आले. या बैठकीला उपायुक्त समाधान सोळंके, शहर अभियंता इकबाल खान, सुरेश हुंगे, जी.एम. पांडे, अनिल बिडवे, राजेंद्र घनबहादूर आणि गुड मॉर्निंग पथकाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी शेख निलंबित
By admin | Published: June 29, 2017 1:18 AM