लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्पदंशासह इतर अनेक लसींचा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये तुटवडा असल्याचे १८ जुलै रोजी समोर आले आहे, तसेच साथीच्या रोगांसाठी उपाययोजनाही करण्यात आल्या नसल्याचे चित्र आहे. पुरवठा होत नसल्याने अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंश, डायरिया, हिवताप, अॅन्टी रेबीज या प्रकारातील एकही लस उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बेलखेड, तळेगाव, हिंगणी या तीन उपकेंद्रांमध्येही लस उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. आरोग्य केंद्रामध्ये तापाच्या गोळ्याही उपलब्ध नसून, रुग्णांवर करावयाच्या प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा आहे. रुग्णांना देण्यासाठी सलाइन उपलब्ध नाहीत. ताप वाढल्यास देण्यात येणारी अॅन्टिबायोटिक औषधे मागील दोन ते तीन महिन्यांपासून उपलब्ध नाहीत. कुत्रा चावला तर त्यासाठी देण्यात येणारे इंजेक्शन नसल्याचे चित्र आहे. हातरुण येथेही औषधांचा तुटवडा आढळला, तसेच सर्पदंशाची लस उपलब्ध असली, तरी त्याचा वापरच करण्यात येत नसल्याचे चित्र आढळले. त्यामुळे सर्पदंशाच्या रुग्णाला अकोला येथे रेफर करण्यात येते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोगावर कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. कुरुम येथील स्थानिक गवरजाबाई रामनाथजी सारडा प्राथमिक आरोग्य केंद्रात काही प्रमाणात औषध साठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. सर्पदंशाची लस उपलब्ध असून, औषध साठा काही प्रमाणात उपलब्ध आहे. खोकल्याचे औषध मागील सहा महिन्यांपासून संपले आहे; मात्र तरीही जिल्हा स्तरावरून आजपर्यंत उपलब्ध झाले नाही. साथरोगावर उपाययोजना म्हणून साथरोग किट तयार करण्यात आल्या आहेत. कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशाची लस उपलब्ध आहे.औषध पुरवठा मागील महिन्यात कमी होता; परंतु आता आवश्यक तो औषध पुरवठा उपलब्ध झाला आहे. पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अतिसाराच्या गोळ्या व सलाइनचा तुटवडा असल्याचे आढळले. सर्पदंश लस मात्र उपलब्ध होती. उपलब्ध आहे. कान्हेरी आणि धाबा येथे औषध साठ्यासह सर्पदंशाची लस उपलब्ध असल्याचे आढळले. बार्शीटाकळी तालुक्यात धाबा, कान्हेरी, महान, पिंजर हे चार प्राथमिक आरोग्य केंदे्र असून, २३ उपकेंदे्र आहेत. या ठिकाणी मात्र साथरोग नियंत्रणासाठी आवश्यकऔषध साठा नसल्याचे समोर आले आहे. त्याकरिता तात्पुरत्या औषधोपचाराची सुविधा असून, साथीचे आजार उद्भवल्यास प्रा. आ. केंद्रात रुग्णाला पाठविण्यात येते.अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषध साठा पुरवठाच करण्यात आल्या नसल्याचे चित्र आहे. उपकेंद्रांची अवस्था दयनिय असून कुठलीही सुविधा मिळत नाही.