अकोला: गुन्ह्यांचा तपास, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलिसांना ऊन, वारा, पाऊस यांना सामोरे जावे लागते. सध्या उष्ण तापमान लक्षात घेता, पोलिसांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, या दृष्टिकोनातून शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यशाळा शुक्रवारी आयोजित केली होती.कार्यशाळेमध्ये डॉ. संदीप चव्हाण यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या टिप्स दिल्या आणि मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर होते. मंचावर पोलीस निरीक्षक विलास पाटील उपस्थित होेते. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या सूचनेनुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कर्मचाºयांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेला शहर वाहतूक शाखा, सिटी पेट्रोलिंग, दामिनी पथकाचे २०० कर्मचारी उपस्थित होते. डॉ. संदीप चव्हाण यांनी उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर रुमाल, टोपी परिधान करावे, कर्तव्य बजाविताना सावलीत शक्यतो उभे राहावे, एकाच ठिकाणी उन्हात उभे न राहता शरीराची हालचाल करीत राहावी, जास्तीत जास्त पाणी प्यावे, लिंबू सरबत, ताक, मठ्ठा प्यावे, शरीरात ग्लुकोजचे प्रमाण कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी, सैल कपडे परिधान करावेत, माठाचे थंड पाणी प्यावे, कर्तव्यावरून घरी गेल्यावर थंड पाण्याने अंघोळ करावी, उन्हाळ्यात तेलकट, मसाल्याचे पदार्थ खाण्याचे टाळावे, जेवणानंतर पायी फिरावे, अशा काही टिप्स डॉ. चव्हाण यांनी दिल्यात. (प्रतिनिधी)