लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुंबईतून कोकेनचा बेकायदा गोरखधंदा करून अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांना कोकेन विक्री व खरेदी करणार्या दोघांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विक्की धनवानी व रितेश संतानी असे या दोघांची नावे असून, अन्य आरोपींचा अद्यापही शोध लागला नसल्याचे वास्तव आहे.अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांसाठी आणण्यात येणारे ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून जप्त केले होते. या कोकेनची राज्यातील किंमत दोन लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (१९) याला अटक केली होती. हिरोळे हा मुंबईतील रहिवासी तसेच मूळचा नायजेरिया येथील ‘जेम्स’ ऊर्फ लुक चिक इजियानी रा. मीरा रोड नामक व्यक्तीकडून कोकेनची खरेदी करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. यावरून रामदासपेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेम्सचा शोध घेत मुंबईतून अटक केली. हिरोळे व जेम्स या दोघांच्या चौकशीतून सिंधी कॅम्पमधील विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश कन्हैयालाल संतानी हे दोघे अकोल्यातील कोकेनचे खरेदीदार असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे सदर दोघांना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने प्रयत्न केले; मात्र दोन्ही खरेदीदारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर नियमित जामीन अर्जावरील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश कन्हैयालाल संतानी या दोघांनी कोकेनची खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, त्यांच्या आणखी साथीदारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
कोकेनमुळे अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळीकोकेनची बेकायदा खरेदी व विक्री प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे; मात्र यामागे असलेल्या सूत्रधारांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. संतानी व धनवानी दोघांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला असल्याने पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती आहे. कोकेन जप्त करताच यामध्ये अकोल्यातील बड्या धनदांडग्यांची नऊ मुले सहभागी असल्याचे समोर आले होते; मात्र त्यानंतर केवळ दोनच नावे समोर आली असून, अन्य नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत.