अकोला : जिल्ह्यातील रिक्त ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी जाहीर करण्यात आलेल्या ३४५ उमेदवारांच्या निवड यादीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या ८४ आक्षेपांवर सुनावणी घेण्याची प्रक्रिया गुरुवारपासून (दि. १६) जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात रिक्त असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील एक हजार ५३२ अर्जांमधून आपले सरकार सेवा केंद्रांसाठी ३४५ उमेदवारांची अंतिम निवड यादी १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या निवड यादीसंदर्भात तक्रारी असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवड यादीवर १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तक्रारी व आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्रांसाठी उमेदवारांच्या निवड यादीवर ८४ आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले. या तक्रारी व आक्षेपांवर सुनावणी घेण्याची प्रक्रिया १६ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सुरू केली. त्यामध्ये काही आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली असून, उर्वरित आक्षेपांवर सुनावणीची प्रक्रिया येत्या सोमवारपर्यंत (दि.२१) पूर्ण करण्यात येणार आहे.