लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन सर्वसाधारण सभेत १४ सप्टेंबर रोजी वेळेवरच या विषयांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या १७ ठरावांच्या मुद्यांवर मंगळवार, ६ आॅक्टोबर रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील सत्ता पक्षासह विरोधकांनी विधिज्ञामार्फत बाजू मांडली. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रकरणात विभागीय आयुक्तांकडून लवकरच आदेश पारित करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने विभागीय आयुक्तांच्या आदेशाकडे आता जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.१४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आली. या सभेत वेळेवरच्या विषयांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विविध १७ ठरावांविरोधात जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर यांच्यासह १४ सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत अपील दाखल केले होते.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सभेत वेळेवर मंजूर करण्यात आलेल्या ठरावांना स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी २२ सप्टेंबर रोजी दिला होता.या प्रकरणात ६ आॅक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये जिल्हा परिषदेतील सत्ता पक्षासह, प्रशासन आणि विरोधकांच्या वतीने विधिज्ञांनी बाजू मांडली. सुनावणीच्या वेळी जिल्हा परिषद सत्ता पक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर, सदस्य डॉ. प्रशांत लढाऊ, गजानन वजीरे, संजय अढाऊ आदी उपस्थित होते. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्हा परिषदेच्या सभेत वेळेवरच्या विषयांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांसंदर्भात विभागीय आयुक्तांकडून लवकरच आदेश पारित करण्यात येणार आहे. त्यामध्ये विभागीय आयुक्तांकडून काय आदेश पारित होणार, याकडे आता जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या सभेतील मंजूर ठरावांवर सुनावणी पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 10:46 AM