लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सातही पंचायत समित्यांमध्ये खरेदी केलेल्या सीसी कॅमेरे खरेदीची चौकशी करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार उद्या अकोला येथे सुनावणी घेत आहेत. त्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे बजावण्यात आले आहे. पंचायत समित्यांमध्ये गरज नसतानाही जिल्हा नियोजन समितीच्या २९ लाख रुपये निधी खर्चातून सीसी कॅमेरे खरेदी घोटाळा झाला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्या खरेदीमध्ये ई-टेंडरिंगला फाटा देण्यात आला. याप्रकरणी मोठा घोळ असल्याचे सांगत आमदार रणधीर सावरकर यांनी पुराव्यानिशी शासनाकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नियोजन समितीचे सचिव या नात्याने २५ जानेवारी २०१६ रोजी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत २९ लाख रुपये खर्चाला जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदरसिंग यांनी प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली. या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांनी नियोजनबद्धतेने घोटाळा केल्याचे सांगत आमदार सावरकर यांनी कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सादर केलेल्या अहवालात याप्रकरणी क्लिन चीट देण्यात आल्याचे सभागृहात सांगण्यात आले, त्यामुळे मोठा घोळ असल्याची शंका खुद्द ग्रामविकास मंत्र्यांनीच व्यक्त केली. सोबतच एक महिन्यात चौकशी करून संबंधितांवर निश्चितपणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली. त्या सुनावणीसाठी ते उद्या अकोल्यात येत आहेत.
सीसी कॅमेराप्रकरणी आज सुनावणी
By admin | Published: May 17, 2017 2:06 AM