अकोला : ग्रामीण भागात हृदयरोग, किडनी व कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, अशा रुग्णांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे १५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील ५९ रुग्ण पात्र ठरले असून, त्यांना लवकरच हे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. गत काही वर्षांपासून हृदयरोग, किडनी व कॅन्सरने ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून, अनेक रुग्ण हे स्वत: त्यांच्या कुटुंबाचा आधार आहेत. आजाराने पीडित या रुग्णांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील अशा रुग्णांना १५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार, या तीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना अनुदान देण्यासाठी ४९ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील १९५ रुग्णांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केला होता. त्यापैकी ५९ रुग्ण या योजनेसाठी पात्र ठरले असून, त्यांना १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
आठ लाखांचा निधी करणार वितरित
हृदयविकार, किडनीचा आजार, कॅन्सरने ग्रस्त ग्रामीण भागातील रुग्णांना १५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना तयार करण्यात आली. यासाठी ४९ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात १९५ रुग्णांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३५ अर्जदार अपात्र ठरले, तर उर्वरित अर्जांमधील ५९ रुग्णांची निवड करण्यात आली. याअंतर्गत ८ लाख ८५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.