अकोला : हवामान विभागाच्या माहितीनुसार या वर्षातील मे महिन्यात उष्णतेच्या लाटांच्या वारंवारितेचे दिवस अधिक राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांच्यापरीक्षा याच महिन्यात घेतल्या जात असल्याने त्या एक महिना आधी म्हणजे, एप्रिलअखेर घेण्याचे नियोजन शासन स्तरावर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी काही संघटनांच्या मागणीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना १३ फेब्रुवारी रोजीच पत्र दिले आहे.राज्यातील विद्यापीठांच्यापरीक्षा दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात घेतल्या जातात. या काळात राज्यात सर्वत्र उन्हाचा पारा वाढलेला असतो. त्यातच विदर्भ, मराठवाड्यात तीव्र उष्णता असते. या बाबी पाहता यावर्षी हवामान खात्याने मे महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटांची वारंवारिता वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. या वातावरणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विदर्भ, मराठवाड्यात तीव्र उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांनी ना. भुजबळ यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांना दिलेल्या पत्रात ना. भुजबळ यांनी म्हटले आहे.