मूर्तिजापूर - मूर्तिजापूर तालुक्यात गत तीन दिवसापासुन सुरु असलेला संततधार पाऊस थांबता थांबत नसुन, आज तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने राजनापूर खिनखीनी, कुरुम, कवठा, मंडूरा, रामटेक, कासारखेड, कार्ली, माना आकोली, सैदापुर, नवसाळ ही गावे पाण्याखाली आली असून सर्वात जास्त नुकसान कुरूम, राजनापूर, खिनखीनी, कवठा, सैदापुर या गावात झाल्याची माहिती असून, ही गावे जलमय झाली आहे. आतापर्यंत मूर्तिजापूर तालुक्यात आतापर्यंत 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पोही- माना, कवठा - कुरूम या गावा दरम्यान मोठे नाले असल्याने संपर्क तुटला आहे रात्री उशिरा अचानकपणे उपरोक्त गावांच्या परीसरात पावसाने रौद्ररूप धारण केल्याने गावालगत असलेले अंबर नाला, मोरीमाय नाला, जामठी नाला, सैदापुर नाला, कवठा, खिनखीनी हे सर्व नाले तुडुंब भरून वाहू लागले.प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी नाल्यातून पुढे जात नव्हते. नाल्याचे बांध फुटून पाणी गावात शिरले गावात शिरलेल्या पाण्याने गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी शेतात शिरल्याने गावा लगत व नाल्यांच्या परीसरातील शेत जमीनीवरील पिके अक्षरशः खरडून गेले आहे.राजापूर येथील जिल्हा परिषद शाळा परीसरात पहाटे ५ वाजता फुट पाणी असल्याने तेथील सहादेव सोळंके, रामदास हिवराळे, बबनराव सेजव, तुळशीराम सेजव, मनोज कडू, मुकुंदा भागवत विनोद चक्रे, मारोतराव गाडगे, यांच्या घरात पाणी शिरल्याने या कुटुंबीयांना जिल्हा परिषद शाळा व महादेव मंदिरात स्थानांतरीत करावे लागेले यामध्ये यांच्या घरातील अन्नधान्य ओले झाले व महादेव सोळंके यांनी अनुदान घरकुलबांधण्यासाठी आणलेले १५ पोती सिमेंट वाया गेले आहे. कवठा सोपीनाथ येथील बाळू बाजड यांचे मातीत बांधकाम असलेले अर्धे घर पडून त्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे असून कुठलीही जीवितहानी झाली नाही.
हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गत ती दिवसांपासून संततधार पावसामुळे तालूक्यातील हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली आली असून शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे जलमय झालेल्या शेतातील पिके सडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे तर अनेक गावांना पुराचा तडाखा पसरल्याने त्या परीसरातील जमीन खरडून गेल्या ने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलीसांच्या सतर्कतेने वाचले दोघांचे प्राणकुरूम नजीक राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून या रस्त्याचे काम करणारे दोन मजूर रस्त्यालगत शेतात एका घरात अडकून पडले होते. तेथे असलेल्या नाल्याला प्रचंड प्रमाणात पुर असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला होता. माना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंदू पाटील यांनी प्रसंगावधान राखून महादेव गुणाजी वऱ्हेकर (६५) विकास नामक मजूरांना पाण्यात दोर टाकून पोहणे येत असलेल्या व्यक्तीला व्यक्तीला त्यांच्या पर्यंत पोहोचवीले आणि त्यांच्या कमरेला दोर बांधून त्यांना लोकांच्या मदतीने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.
सतत तीन दिवसांपासून पासून पाऊस पडत असल्याने आम्ही नैसर्गिक आपत्ती कडे लक्ष ठेवून आहेत काही भागात अचानक अतिवृष्टीमुळे तालूक्यातील कही गावात पाणी शिरले आहे आपत्ती निवारण व पाहणी करण्यासाठी आमची टिम घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या परीस्थितीत पावसामुळे नुकसानाचा अधिकृत आकडा सांगणे शक्य नसले तरी पाहणी करून नुकसानग्रस्त लोकांना शासकीय मदत मिळण्यासाठी शासनाकडे आढावा सादर करणार आहे. नुकसानग्रस्तांना निश्चितच शासकीय मदत मिळेल.- भागवत सैंदाणे , उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर