सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दलित वस्ती विकास निधीतील कामांची यादी तयार करताना सत्ताधारी भारिप-बमसंच्या ताब्यात असलेल्या समाजकल्याण विभागाने भाजपच्या ताब्यात असलेल्या तीन जिल्हा परिषद गटांत कोट्यवधी, तर भारिपच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांना तीन लाखांपेक्षाही कमी निधी देण्याचे नियोजन केले. हा प्रकार उघड होताच समितीचे सदस्य आक्रमक झाले. जिल्हा परिषद अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर ९ कोटी ६७ लाख रुपयांच्या कामांची यादी स्थगित करण्याचे आदेश त्यांनी दिल्याची माहिती आहे.दलित वस्ती विकास आराखड्यानुसार गावांमध्ये निधी मंजूर केला जातो. त्यासाठी संबंधित सरपंच, ग्रामसेवकांकडून थेट प्रस्ताव आणि अंदाजपत्रके घेऊन निधी वाटपाचे नियोजन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच समाजकल्याण समितीमध्ये मंजुरीसाठी यादी आल्यानंतरच घोळ उघड झाला. मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये तब्बल २ कोटी २0 लाख रुपयांच्या कामांची यादी तयार झाली. २२ गावांतील दलित वस्तीच्या नावापुढे निधी देण्यात आला. त्यातही भाजप सदस्याच्या सिरसो गटातच हा निधी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या एकाच मतदारसंघातील गावांमध्ये एक कोटी रुपयांचे नियोजन आहे, तर सम्राट डोंगरदिवे यांच्या हातगाव मतदारसंघात केवळ तीन लाख असल्याचे यादीतून स्पष्ट होते. अकोला तालुक्यातील ३२ गावांच्या दलित वस्त्यांसाठी २ कोटी १७ लाख रुपये आहेत. विशेष म्हणजे, या तालुक्यात भारिप-बमसंची सदस्य संख्या अल्प आहे. सदस्य सरला मेश्राम यांच्या मतदारसंघातही निधी मिळालेला नाही. त्याउलट इतर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये निधीचे वाटप मोठय़ा प्रमाणात दर्शविण्यात आले आहे. बाळापूर तालुक्यातील निमकर्दा मतदारसंघावरही अशीच मेहरबानी दाखविण्यात आली. ८0 लाख रुपये या गटातील गावांमध्ये देण्यात आले आहेत. बाश्रीटाकळीतील कान्हेरी सरप गटालाही मोठे झुकते माप देण्यात आले. पातूर तालुक्यातही तोच प्रकार घडला आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या गटांची परवडजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण यांच्या गटातील गावांची निधीसाठी परवड होत आहे. उपाध्यक्षांच्या हिवरखेड गाव असलेल्या मतदारसंघातील गावांचे नावही यादीत नाही, तर अध्यक्ष वाघोडे यांच्या देवरी मतदारसंघातील कोणत्या गावांना निधी देण्यात आला, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
मूर्तिजापूर मतदारसंघावर डोळायेत्या विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघातून लढण्याची तयारी असलेल्या एका पदाधिकार्याने हा निधी पळवून नेल्याची चर्चा आहे. त्याला बळी पडल्याने सिरसो मतदारसंघात एक कोटी रुपये देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी मूर्तिजापूर पंचायत समितीच्या एका पदाधिकार्याच्या कंत्राटदार पतीचा मोठा हात असल्याचीही चर्चा आहे.