- सचिन राऊत
अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्याला लागून असलेल्या माता नगरमध्ये सिलिंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीत तब्बल अकरा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अग्नितांडवामध्ये माता नगरातील तब्बल ६० झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये लाखो रुपयांची हानी झाली असून, ३० ते ३५ संसार उघड्यावर आले आहेत; या घटनेत अनेक झोपडयांमधील १५ सिलिंडर सुरक्षितरित्या हलविण्यात आल्याने आग आणखी पसरली नाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.माता नगर झोपडपट्टीतील एका घरातील सिलिंडरला अचानक गळती लागली. या सिलिंडरच्या गळतीमुळे काही क्षणातच सदर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर या घराला असलेल्या कुडाच्या काडयामुळे व लाकडं जळाल्याने ही आग आजुबाजूच्या झोपड्यांना लागली. त्यानंतर आजुबाजूच्या घरातील तब्बल ११ सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे हा परिसर हादरला. बाजूलाच असलेल्या दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी या आवाजामुळे आरडा-ओरड सुरू केली. मुलांच्या किंकाळ्या सिलिंडरचा स्फोट व प्रचंड धूर या परिसरातून निघायला सुरुवात झाल्याने या परिसरात स्मशानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. काही क्षणातच झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत माता नगरातील संपूर्ण झोपडपट्ट्या खाक झाल्या. बहुतांश घरातील नागरिकांना पैसे व दागिने घेण्यास वेळ न मिळाल्याने लाखो रुपयांचा ऐवज व रोकडही या आगीत खाक झाली. यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती महसूल खात्याच्या अधिकाºयांनी दिली. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या व खासगी पाण्याच्या तब्बल ५० बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यासाठी कसोसीने प्रयत्न करण्यात आल्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही आग नियंत्रणात आली.