-----------------------------------
वणी रंभापूर, बोरगाव मंजू जोरदार पाऊस ; शेतकरी सुखावला !
वणी रंभापूर : वातावरणात झालेल्या बदलाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ; मात्र यंदा पावसाने दडी दिल्याने खरीप हंगामातील पिके करपल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. बुधवारी पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली असून, रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. गत दोन-तीन दिवसांपासून पावसाचे आगमन होत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभी वणी रंभापूर, बोरगाव मंजू परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. त्यानंतर गत पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी दिल्याने अंकुरलेली पिके सुकण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. गत दोन-तीन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. तसेच रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे.
----------------------------------
पिंपळखुटा परिसरात पिकांना जीवनदान !
पिंपळखुटा : जून महिन्यात मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील चान्नी, उमरा, राहेर, अडगाव, चांगेफळ, शिरपूर, वाहाळा बु. परिसरात शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. परीसरात शंभर टक्के पेरणी आटोपल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडले होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. ते शेतकरी पिके वाचविण्यासाठी धावपळ सुरू होती. पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. दि. १० जुलै रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. सध्या शेतकरी डवरणीच्या कामात व्यस्त आहेत.
----------------------------------------
मुंडगाव, लोहारी परिसरात पेरण्यांना वेग
मुंडगाव: मुंडगाव, लोहारी परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. परिसरामध्ये शुक्रवारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. परिसरातील शेतकरी खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तूर, कपाशीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. परिसरात यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी यंदा मूग, उडिदाच्या पिकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.
--------------------------------
अकोला : शहरानजीक असलेल्या खरप परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने नाल्यांना पूर आला होता. दरम्यान, नाल्याकाठच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
--------------------------------