जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना शुक्रवारी ३.३० वाजेच्या सुमारास ढग दाटून आले. परिसरात वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसाला सुरुवात होताच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. वृत्त लिहीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.
------------------------
पेरणीपूर्व मशागतीला उपयुक्त
खरीप हंगाम तोंडावर असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा, तर काही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीसाठी पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
-------------------------------------
वातावरणात गारवा
जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ, तर काही भागात मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. १० ते २० मिनिटे झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. गारव्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
--------------------
दहीहंडा येथेही जोरदार सरी
दहीहंडा परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. वाऱ्यामुळे टीनपत्रे उडाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.