मनोज भिवगडे -
अकोला: शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल. वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की, अनेक भागातील वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे काही भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने शहरात दाणादाण उडवली.
प्रचंड गर्मीने त्रस्त झालेल्या अकोलेकरांना गुरुवारी सायंकाळी आलेल्या मान्सून पूर्व पावसाने दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कडक ऊन पडले असताना अचानक ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर साडेपाच वाजताच्या सुमारास सोसाटाच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास पेक्षा अधिक वेळ कोसळलेल्या पावसाने शहरात सर्वत्र दाणादाण उडवली. बाजारपेठेत हातगाडीवर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांच्या वस्तू पावसाने भिजल्या. शहरातील तोष्णीवाल लेआऊट परिसरात अकोला अर्बन बँक मुख्यालयाच्या समोरील मोठा वृक्ष रस्त्यावर कोसळला. त्यामुळे या वृक्षाच्या खाली असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय वृक्ष रस्त्यावरच पडल्यामुळे या मार्गावरची वाहतूकही बंद झाले होती. याशिवाय शहराच्या अनेक भागात झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक बाधित झाली. शहराच्या काही भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.