३४५ गावे बाधित
बुधवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील ३४५ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये अकोला तालुक्यातील १९९, बार्शीटाकळी २२, मूर्तिजापूर १७, अकोट ५०, तेल्हारा २, बाळापूर ५५ गावे बाधित झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
अकोला, बाळापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान
मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अकोला तालुक्यात सर्वाधिक १९,०७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यापाठोपाठ बाळापूर १२,२४६ हेक्टर, बार्शीटाकळी १८५०, तेल्हारा ३००, मूर्तिजापूर १७६, अकोट १५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे.
गुरुवारच्या पावसानेही नुकसान
जिल्ह्यात गुरुवारच्या पावसानेही काही तालुक्यांत नुकसान झाले आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल अद्याप बाकी असून या पावसामुळेही सोयाबीन, कापूस पिकांना फटका बसला आहे.
शेतकरी मेटाकुटीस
यंदा शेतकऱ्यांनी महागडे बियाणे विकत घेऊन पेरणी केली होती. पिकेही डौलाने उभी होती; परंतु या पावसामुळे शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकतेच पेरणी केलेले पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.