अकोला: गत चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतशिवारात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास अकोला तालुक्यातील सांगळूद परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दुसरीकडे, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मंगळपारी सकाळपासूनच पावसाचे वातारवण नसल्याने शेतशिवार मशागतीच्या कामांनी फूलून गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात असलेल्या शेतमजुरांसह शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सांगळूद परिसरात पुरेसा पाऊस पडल्याने मशागतीची कामे थांबली होती.
थांबलेला पाऊस सक्रीय होणार का?
सध्या शेतात सोयाबीन, कपाशी व तूरीचे पीक बहरलेले आहे. काही भागात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे, तर काही भागात सोयाबीन सोंगणी सुरू आहे. दरम्यान, पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. ऐन सोंगणी व वेचणीच्या वेळी पाऊस सक्रीय होणार की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.