अकोला : यंदाच्या पावसाळ्यात चार महिन्यांपूर्वी अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेली मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अद्याप बाकी आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू असतानाच आता अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चार महिन्यांपूर्वी यंदाच्या पावसाळ्यात गेल्या जुलैमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १ लाख हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त २ लाख ५७१ शेतकऱ्यांना नुकसानीची मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून १६४ कोटी १४ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. मदतीची रक्कम शासनाकडून थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने, जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे बाकी असतानाच आता २ डिसेंबरपर्यंत गेल्या चार दिवसांत अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने पळविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर अवकाळीमुळे नुकसानीची मदत मिळणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
अतिवृष्टीग्रस्त ६५ लाख शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम महसूल प्रशासनामार्फत सुरू आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त २ लाख ५७१ शेतकऱ्यांपैकी १ डिसेंबरपर्यंत ६५ हजार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम अद्याप बाकी असल्याचे वास्तव आहे.
‘अवकाळी’च्या नुकसानीचे पंचनामे सुरू
गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.