लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात विविध ठिकाणी ९ जून रोजी दुपारी वादळासह जोरदार पाऊस झाला. आलेगाव परिसरात सलग दोन तास जोरदार तुफान पाऊस झाल्याने गावातील निगुर्णा नदीला पूर आला होता. लेंडी नाल्यालाही पूर आल्याने या नाल्याच्या काठावर असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. तसेच चोहोट्टा बाजार येथे कारवर रोहित्र कोसळले. सुदैवाने कारमधील पाच जणांचे प्राण वाचले. देवर्डा निजामपूर येथे शाळेची एक वर्गखोलीही जोरदार पावसामुळे जमीनदोस्त झाली. अकोट तालुक्यातील देवरी फाट्यावर वादळामुळे दोन मोठे वृक्ष कोसळल्याने दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. भरपावसात रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती, तसेच तालुक्यात वणी वारुळा, कुटासा, कावसा, दनोरी, पळसोद आदी गावांतही जोरदार पाऊस झाला. चोहोट्टा बाजार परिसरात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. देवर्डा निजामपूर येथील जि.प. शाळेची इमारत पडली.टाकळी खुर्द या मार्गावर जात असताना पंचगव्हाण येथील विलास गवारगुरू यांच्या मालकीच्या एमएच ३0 पी २४0२ या कारवर पूर्ण रोहित्र कोसळल्याने कारचा चुराडा झाला. सुदैवाने यापैकी कुणालाही इजा झाली नाही; मात्र गाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच विद्युत वितरणचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते. देवर्डा निजामपूर येथील जि. प. शाळेतील इमारतसुद्धा पडल्याची माहिती सरपंच खोटरे यांनी दिली आहे. शिर्ला येथे मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अकोला शहराच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली
जोरदार पाऊस; निर्गुणा नदीला पूर!
By admin | Published: June 10, 2017 2:39 AM