जिल्ह्यात सोमवार, दि.२९ ऑगस्ट रोजी पहाटेपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे बळीराजा सुखावला असून, हा पाऊस पिकांसाठी पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारी थांबलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला दुपारी एक वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतात असलेल्या शेतमजुरांसह शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
पावसामुळे आता आरोग्याची चिंता वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे अनेक भागात दवाखान्यात सर्दी, ताप खोकल्याचे रुग्णसंख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात पुरेसा पाऊस पडल्याने मशागतीचे कामे थांबली होती. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात जवळपास ८० हजार हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे सध्या थांबलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, मात्र आता झालेला पाऊस हा पिकांसाठी पोषक असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यातील तीन प्रकल्प १०० टक्क्यांवर!यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस असल्याने प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील मोठे, लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये ८७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी अकोल्याची तहान भागवणारे काटेपूर्णा प्रकल्पात ९४.९८ जलसाठा असून वाढता जलसाठा लक्षात घेऊन प्रकल्पाचेद्वार उघडण्यचा निर्णय प्रशासनाद्वारे घेण्यात येईल. जिल्ह्यातील मोरणा, निर्गुणा व उमा या प्रकल्पाच्या पातळी १०० टक्क्यांवर पोहोचली आहे.