तालुक्यातील दगडपारवा धरणाचे एक वक्रद्वार गुरुवारी उघडल्याने २.५ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू होता. विद्रुपा नदीला आलेल्या पुरामुळे नदी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठी असलेल्या शेतातील पिके खरडून गेली, तर काही शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. या अतिवृष्टीसदृश स्थितीमुळे तालुक्यात शेतातील पिकांसह विहिरींचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. नुकसानग्रस्त भागात पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत त्वरित द्यावी, अशी मागणी होत आहे.
-------------------
पालकमंत्र्यांनी केली पाहणी
तालुक्यात बुधवारी दि. २१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतजमिनी खरडून गेली. नुकसानग्रस्त भागाची शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे, घरांच्या पडझडीचे, मृत पशुधनाचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देण्याचा आदेश शासकीय यंत्रणेला पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, तहसीलदार गजानन हामंद, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी आदींची उपस्थिती होती.