अकोला : गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गत दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात दोनवेळा अतिवृष्टी झाली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील पिके पिवळी पडत असून, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने दाणादाण करीत तोंडी आलेला घास हिरावला होता. यंदाही तसेच चित्र असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
यंदा खरीप हंगामात समाधानकारक उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना होती; मात्र पावसाळा सुरू होण्यास विलंब झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात मूग व उडदाचे पीक घेता आले नाही. ज्या भागात मूग, उडदाची पेरणी झाली. त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याच्या घटना घडल्या आहेत. जुलै महिन्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हापासून सतत ढगाळ वातावरण आणि कधी रिमझिम, तर कधी जोरदार पाऊस पडत असल्याने कपाशी, तूर व सोयाबीन आदी पिके पिवळी पडत आहेत.
-----------------------
शेतीच्या आंतरमशागतीची कामे खोळंबली
सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तण वाढले असून, निंदणी, वखरणी, कोळपणी आदी आंतरमशागतीची कामे थांबली आहेत. तण वाढत असल्याने, पिके धोक्यात आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे कापूस, तूर व सोयाबीन या पिकांवर रोगराई पसरली आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे गळून पडली, तर काही भागात बोंडसळ झाली आहे. तसेच सोयाबीन शेंगा गळत असल्याचे चित्र आहे.
--------------------------
तोंडी आलेला घास हिरावण्याची भीती
सद्यस्थितीत सोयाबीन पीक बहरले असून, भाव चांगला असल्याने शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न होण्याची आशा होती; मात्र अतिपावसाने तोंडी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. तसेच तेल्हारा, बाळापूर तालुक्यात कपाशी वेचणीला आली असून, पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
-----------------------------
सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांमध्ये तण वाढले असून, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- सुनील घोगरे, शेतकरी, टाकळी खुरेशी.