प्रशांत विखे
तेल्हारा: तालुक्यातील खरीप हंगामातील पीक परिस्थिती सद्यस्थिती समाधानकारक आहे. तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ टक्के क्षेत्रावरील नुकसान झाले असून, एकूण ५३ गावांत नुकसान झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, २ हजार ८७७ शेतकऱ्यांचे २ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा खंड वाढत असल्याने शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा असल्यास सिंचन सुरू करावे, असे कृषी विभागाने सुचविले आहे.
तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५८ हजार ५३१ हेक्टर असून, पेरणी योग्य खरीप हंगामाचे पेरणी क्षेत्र ५३ हजार ०१५ हेक्टर आहे. त्यापैकी १०० टक्के पेरणी झाली असून, सद्यस्थितीत पिके बहरली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मूग, उडीद पिकांवर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. मध्यंतरी तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे नदीकाठच्या पिकांना फटका बसला. मुसळधार पावसामुळे २ हजार ५३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यंदा तालुक्यात पिकांवर वाणीचे आक्रमण वाढल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे.
-------------------
या पिकांचे झाले नुकसान
कापूस १,१७७.४३
सोयाबीन २८८.१९
तूर १७५.५९
मूग १४६.१७
उडीद १६५.३६
इतर १००.५०
-----------------
पेरणी झालेले क्षेत्र
कापूस २२,५४४ हेक्टर
सोयाबीन १६,८५२
तूर ५,६४९
मूग ३,२००
उडीद २,१०६
ज्वारी १,०९१
मका ७०
इतर १,५०२
----------------
शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था असल्यास पावसाची वाट न बघता सिंचन सुरू करावे, हवामान खात्याने १५ ऑगस्टपासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पाहता वेळीच फवारणी करावी. काही अडचण किंवा मार्गदर्शन लागल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.
-मिलिंद वानखडे,
तालुका कृषी अधिकारी.
----------------
अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेल्या पिकांचे पंचनामे करून त्याबाबत अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. आजपर्यंत शासनाच्या नियमानुसार हेक्टरी ६,८०० रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. निधी प्राप्त होताच तत्काळ वितरित करण्यात येईल.
-डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार, तेल्हारा.