तेल्हारा : पंधरा दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार आगमन केले. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून, ढगाळ वातावरण कायम आहे. तालुक्यात अवघ्या काही दिवसांनंतर सोयाबीन सोंगणी सुरू होणार असून, कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, मूग, उडिद, तूर ज्वारी या पिकांची पेरणी केली असून, जिवापार जपली आहेत. पीक घरात येण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अचानक जोरदार पावसाची हजेरी लावल्याने अनेक पिके मातीमोल होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तालुक्यातील काही भागांत कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. दि. २२ सप्टेंबरला दमदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांची पडझड झाली आहे. कपाशीला लागलेल्या फुलपात्या गळून पडल्या असून, शेतात पाणीच पाणी साचले आहे. हवामान खात्याने अजूनही पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा ज्वारी, तूर पिकांनाही फटका बसला असून, रोगराई वाढण्याची शक्यता आहे. सततच्या संकटाने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
-------------------
सौंदाळा परिसरात पांढऱ्या सोन्याची मातीमोल भावात विक्री
सौंदाळा : परिसरात (पांढऱ्या सोन्याची) कापसाची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी ६१०० रुपयांपासून ते १०,००१ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल खरेदी केली. मात्र, सद्य:स्थितीत कापसाची मातीमोल भावात विक्री होत असून, शेतकरी हतबल झाला आहे. परिसरात कापसाला प्रतिक्विंटल ३,५०० ते ५,५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत. सततच्या पावसाने कपाशीच्या बोंड्या काळ्या पडत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट होत आहे. पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होण्याची भीती आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.
-------------------
कापसाचे पीक पाण्यामुळे खराब झाले आहे. कपाशीच्या बोंड्या कळ्या झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी कापसाचे भाव ८००० रुपये होते. यावर्षी मुहूर्तावर दहा हजारावर भाव मिळाला, मात्र, आता मातीमोल भावात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याचे चित्र आहे.
- गणेश गोतमारे, शेतकरी.