वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत आठवड्यात चांगला पाऊस बरसल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपल्या होत्या ; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने परिसरातील चिंचोली, तामसी, हिंगणा, दिग्रस बुद्रूक, तुलंगा बुद्रूक, दिग्रस खुर्द, तुलंगा खुर्द, नकाशी, देगाव परिसरातील पिके धोक्यात सापडली होती. तसेच पेरण्या रखडलेल्या आहेत. हवामान खात्याने चांगल्या पावसाचे भाकीत केले होते. सुरुवातीला समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने प्रारंभी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर आठवडाभरापासून दडी मारल्याने उगवलेली पिके संकटात सापडली होती. दरम्यान बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे.
-----------------------
गावात साचले होते पाणी
वाडेगाव गावासह परिसरात दमदार पाऊस झाला. पावसामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचले होते. नागरिकांना रहदारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, चांगला पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
----------------
डवरणीचे काम सुरू !
दोन ते तीन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरण्या रखडलेल्या होत्या. पावसाने हजेरी लावल्याने डवरणीचे काम सुरू झाले आहेत. तसेच रखडलेल्या पेरणीचे कामे पुन्हा सुरू होणार, असल्याचे शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.
------------------------------
वाडेगाव येथे सिंचनाची व्यवस्था असल्याने पेरणी केली. सध्या बियाणे अंकुरलेले आहे. दुपारी पाखरे व रात्रीच्या सुमारास वन्य प्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
-दत्तात्रय वासुदेव मानकर, शेतकरी.
------------------------
गतवर्षीच्या हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना यावर्षी शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
-अक्षय घनश्याम लोखंडे, शेतकरी वाडेगाव.